Thursday, February 18, 2010

तुमच्या एकांताचे ऑपरेशन

तूर्तास तुम्हीसुद्धा कवी आहात असे समजून चला.
(म्हणजे इथली गर्दीसुद्धा तुम्हाला सार्वजनिक नाकारेल)
तुम्हांला जाणवेल आपण एकटे एकटे आहोत.
आणि तुमचा मेंदू एखाद्या उद्यानात
एकांताच्या शोधात केव्हाचा
एक बाक अडवून बसला आहे
तुम्ही प्रयोग म्हणून हॉस्पिटलमध्ये धाव घेता इलाजासाठी
आणि वर्तमानाच्या बेसिनमध्ये तुम्ही धुता तुमचे
बरबटलेले हात
तुमच्या बरगड्यांच्या पियानोमधून वाजत राहतो.
एकांताचा भेसूर
डॉक्टर निदान करतात
तुमच्या एकांताला मुळात नागिणीचा डौल नाही.
आणि कवितेसाठी एक दीर्घकालीन ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही
खरे तर तुम्ही स्वतः मान डोलावत नाही
पाठीत एक परिचयाची कळ येते म्हणून तुम्ही
मान फिरवता खिडकीच्या दिशेने
तर तोच तुमचा होकार मानला जातो मग तुम्हालाही वाटते.
निदान दोन दिवस तरी अधिक समंजसपणे
पाहता येतील असे
ऑपरेशसाठी तुम्हाला ताज्या वर्तमानपत्राचं
सलाइन देण्यात येतं. आता तुमची उर्जा असते.
समुद्रकिनारारेल्वेफलाटबाजारगल्ली इत्यादी.
आणि अचानक तुम्हाला कळतं की,
तुमच्या हातपायनाककानडोळेमन खिडकीच्या दिशेने पसरताहेत
आणि सारं ऑपरेशन थिएटरच
बाहेरची गर्दी डोक्यावरून वाहत नेत आहे।

- संदेश ढगे

साभार : मराठीमाती.कॉम
Publish Post

No comments:

Post a Comment